तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल | Your fast will be a healthy fast
Healthy Fast Food |
सृजनाचा, चैतन्याचा हा उत्सव भारतीयांच्या परंपरा, सणावारांमधील प्रमुख असा आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्री साजरा होणारा उत्सव. या उत्सवात नऊ दिवस उपवास केल्यास देवीची कृपा, आशीर्वाद लाभून घरात सुख-समृद्धी नांदते, ही भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून नऊ दिवस उपवास केले जातात. काही ठिकाणी दोन्ही वेळ उपवासाचे पदार्थ सेवन करण्याची प्रथा आढळते, तर काही ठिकाणी धान्य फराळ, एक भुक्त उपवास केले जातात, म्हणजेच एकवेळ उपवासाचे पदार्थ व रात्री दूधातील दशमी, भेंडीची तूपाच्या फोडणीतील भाजी असे पदार्थ खावून उपवास केले जातात.नऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच आपल्या संयमाची, आरोग्याची परीक्षाच असते. एकतर उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाणे, साबुदाणा यांसारख्या घटकांचा समावेश असल्यामुळे अॅॅसिडिटीचा त्रास होतो. शिवाय नऊ दिवस उपवासाचे पदार्थ करावे तरी कोणते? हा यक्ष प्रश्न असतोच. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको..या पेचात तुम्ही पडला असाल तर नवरात्रासाठी पुढील प्लॅन फॉलो करा..यामुळे तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल आणि नऊ दिवस तरतरी, शक्ती याची अजिबात उणीव तुम्हाला भासणार नाही.
खारी लस्सी :- घट्ट सायीचं दही, साधं मीठ, सैंधव मीठ, जिरे पावडर आणि आवडत असल्यास किंचित काळीमिरी पावडर घालून मिक्सरधून काढून घ्या. यात तुम्ही कोथिंबिरीची पानंही घालू शकता. ही खारी लस्सी गार करून प्यावी.
उपवासाचा ढोकळा :- भिजवलेली भगर, साबुदाण्याचं पीठ, दही एकत्र वाटून घ्या. या मिश्रणात मीठ आणि फ्रूट सॉल्ट घालून वाफवून घ्या, त्यापूर्वी त्यावर काळीमिरी पावडर भुरभुरा. गार झाल्यावर ढोकळा कापून घ्या.साजूक तूप, जि-याची फोडणी यावर पसरवून कोथिंबीर भुरभुरावी.
आलू पराठा :- बटाटा कुस्करु न घ्या. साजूक तूपात जिरे तडतडले की हिरवी मिरची, कोथिंबीरचं वाटण घाला. बटाटा, मीठ, काळीमिरी पावडर घालून एकजीव करु न थंड होऊ द्या.राजगिरा पीठात किंचित भगरीचं पीठ घालून कणीक मळून घ्या.या गोळ्यातून पुरी लाटून बटाट्याचे सारण भरु न पराठा लाटून साजूक तूपावर शेकून घ्या. घट्ट सायीच्या दह्यासोबत हे पराठे खाता येतात.
रताळ्याची खीर :- रताळी धुवून सोलून किसून घ्या. साजूूक तूपात हा किस घालून मंद आचेवर परतून घ्या, किस चांगला नरम झाला की दूध घालून उकळू द्या. मंद आचेवर दहा मिनिटं तरी उकळायला हवे. नंतर यात साखर घालून आणखी उकळू द्या. शेवटी वेलची पावडर, सुक्यामेव्याचे काप घाला. ही खीर घट्ट आणि व थंडच चांगली लागते. एक बाऊल खीर म्हणजे रात्रीचा परिपूर्ण आहार होईल.
नाश्ताअरबी/बटाटा/सुरण चाट :- तिघांपैकी काहीही एक उकडून सोलून मध्यम आकारात तुकडे करु न घ्या. या तुकड्यांवर शिंगाड्याचं पीठ, मीठ भुरभुरु न चांगले घोळवून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करु न त्यावर हे तुकडे शॅलो फ्राय करा. नंतर त्यावर तळलले शेंगदाणे, कोथंबीर आणि लिंबू रस घालावा.
डोसा-भाजी :- भगर-साबुदाण्याचं पीठ भिजवून त्यात मीठ आणि तेल घालून दोन तास मुरवत ठेवा. राजगिरा, शिंगाडा पीठही घालू शकता. नंतर पॅनवर डोसे काढून घ्या. यासोबत उकडलेले रताळे, सुरण, अरबी याची कोरडी किंवा रस्सा भाजी खाता येते.
शिंगाड्याची कढी :- ताकात दोन चमचे शिंगाडा पीठ घालून घुसळून घ्या. साजूक तूपात जिरे, हिरवी मिरचीची फोडणी करा. हवी असल्यास लाल साबूत मिरची घालू शकता. नंतर ताक-पीठाचं मिश्रण घाला. चवीनुसार मीठ, सैंधव मीठ, चवीला साखर, चालत असल्यास किसलेले आलं घाला. चांगली उकळी येऊ द्या. गरमागरम कढी प्या
Comments
Post a Comment