उंदराची टोपी | Undarachi Topi
उंदराची टोपी - Undarachi Topi
Mouse Cap |
Undarachi Topi: एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. 'शिंपीदादा, 'शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.
उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.
शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !'
हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.
तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
Comments
Post a Comment