फळांचे फायदे | Benefits of Fruits



fruits for health
      Fresh Fruits     

*फळ व त्याचा उपयोग* /  Fruits and Its Uses  :

फळात जीवनसत्वे, आम्ले आणि संप्लवनशील तेले (व्होलाटाईल ऑईल्स) असतात. संप्लवनशील तेलामुळे भूक चांगली लागण्यास मदत होते. आंबा,कलिंगड, चेरी आणि अन्य काही फळात 'बीटा कॅरॉटीन' नावाचे द्रव्य असते. आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. फळात 10 ते 15 टक्के मिनरल्स म्हणजेच खजिनद्रव्ये म्हणजेच धातू, अधातू, क्षार असतात. या खजिनद्रव्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, गंधक, फॉस्फरस, लोह, तांबे या धातू मूलद्रव्याचा समावेश होतो. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते. दातांचे आरोग्य चांगले राहते. 
फळे आणि भाज्यांमध्ये महत्वाची जीवनसत्वे, खनिजे आणि वनस्पती रसायने असतात. त्यात फायबर देखील असतात. फळे आणि भाज्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत आणि त्यांना तयार करण्याचे, शिजवण्याचे आणि सर्व्ह करण्याचे अनेक मार्ग आहेत. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर आहार कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतो.भरपूर फळे आणि भाज्या खाल्ल्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि काही कर्करोगांसह अनेक रोगांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. जीवनसत्त्वे आणि खनिजे,फळे आणि भाज्या जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द असतात .जे आपल्याला निरोगी आणि उत्साही वाटण्यास मदत करतात
आंबा - Mango
आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.
अंजीर - Fig
अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.
अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.
जांभूळ - Java Plum
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक घोटभर  पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या  केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.
डाळींब - Pomegranate
डाळिंबात अनेक औषधी गुण आहेत. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते. आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार (संगहणी) बरा होतो. काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते.
 बोरे - Jujube
आंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी जीवनाश्यक सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण, वातविकार यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. निम्या प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा. हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्तच प्रभावी ‘ब्रेनटॉनिक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस टाकून मलग तयार करा. हे मलम चेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.
केळ - Banana
केळे हे शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते. हे लक्षात ठेवावे. तसेच ते थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो. तरूण वयात उद्भवणाऱ्या स्वप्नावस्थेच्या विकारावररोज जेवणानंतर १ ते २ केळी खाल्याने १५-२० दिवसांत उपाय होतो.वजनवाढ करण्यासाठी केळांचा उपयोग होतो.नियमितपणे केळी खाल्ल्यास  दहा दिवसात वजन वाढलेले दिसेल .मुलांना दररोज एक केळी दिल्यास त्यांच्या शरीराची वाढ चांगली  होते. 
स्ट्रॉबेरी - Strawberry
चवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण, मळमळ, त्यामुळे अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी. वर पाणी पिऊ नये. रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे.  
 पपई - Papaya
पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते. पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा. जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.
लिंबू - Lemon
लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. सर्दी कमी करण्यास 'क' जीवनसत्व उपयुक्त ठरते. 'क' जीवनसत्वामुळे 'स्कर्व्ही' सारखा रोग होत नाही.
 ऊस - Sugarcane
ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. 
द्राक्षे - Grapes
द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.
आवळा - Amala
आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात.  याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.
 आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते. त्यायोगे अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत.
रक्तात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास माणसे चिडक्या स्वभावाची बनतात. मॅग्नेशियम मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीचा उत्साह मंदावतो. माणसास थकवा जाणवतो. रक्तातील सोडियम अन्नपचनाला मदत करते. पोटॅशियममुळे जखमांच्या वेळी रक्त थिजण्याच्या (क्लॉटिंग) क्रियेला मदत होते. थिजण्याच्या सक्षम क्रियेमुळे रक्तस्त्राव जास्त होत नाही. पोटॅशियम यकृताला उत्तेजित करते. आयोडीनमुळे कंठस्थ ग्रंथीचे आरोग्य चांगले राहते. त्यायोगे थायरॉईड ग्रंथीच्या संबंधित विकार जडू शकत नाहीत. सर्वसमावेषक संतुलित आहारामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा, मोसमी किंवा बिगरमोसमी, त्याचबरोबर बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, चारोळी, इ. ड्रायफ्रुटसचा समावेश असणे अगत्याचे आहे.

Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi